कुलदीप नय्यर
पत्रकार, लेखक, राजनैतिक अधिकारी आणि संसदपटू म्हणून ख्यातनाम असलेल्या कुलदीप नय्यर यांचा जन्म सियालकोट इथे १९२४ मध्ये झाला. सियालकोटमधील मरे कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. तर लाहोरच्या लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. नंतर त्यांनी एन्व्हान्स्टन इथल्या नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीतून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गोविंद वल्लभ पंत आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. इंग्लंडमध्ये ते भारताचे उच्चायुक्त होते आणि नंतर राज्यसभेचे सदस्यही होते. एक अभ्यासू संसदपटू म्हणून त्यांनी राज्यसभा गाजवली. यू.एन.आय. आणि पी.आय.बी. या वृत्तसंस्थांत आणि 'स्टेट्समन 'व 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रांत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. लंडन येथील 'द टाइम्स'चे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून त्यांनी २५ वर्ष काम पाहिलं. त्यांचा स्तंभ जगातील ८० नियतकालिकांत एकाच वेळी प्रसिद्ध होत असे.