करण जोहर

हिंदी फिल्म इंडस्ट्रीत तसंच रसिक प्रेक्षकांना करण जोहर हे नाव माहीत नसणं विरळा! दिग्दर्शन, निर्मिती आणि चित्रपट लेखन या तीनही क्षेत्रांत करणने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्याचे वडील म्हणजे सिनेसृष्टीतील ख्यातनाम निर्माते यश जोहर! त्यांच्या मृत्यूनंतर ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ची धुरा व वडलांचा वारसा करण पुढे नेत आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करणने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. ‘कुछ कुछ होता है' हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट ब्लॉक ब्लस्टर ठरला. त्याने आजवर सहा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून वीसहून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०१५ साली आलेल्या ‘बॉम्बे वेल्वेट' या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटातून त्याने अभिनयाच्या क्षेत्रात रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं. अनेक क्षेत्रांत सहज वावरत असणारा करण ‘कॉफी विथ करण' या सेलिब्रिटी चॅट ‘शो’चं सूत्रसंचालन करतो. फॅशन डिझायिंनग हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय असून त्याने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', ‘मोहब्बतें' आणि ‘दिल तो पागल है' या चित्रपटांसाठी कॉस्च्यूम डिझायनिंग केलं आहे. ‘करण’ हे फिल्म इंडस्ट्रीतील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असून, या इंडस्ट्रीचा जणू तो प्रवक्ताच आहे! २००७ साली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे निवडण्यात आलेल्या २५० ‘ग्लोबल यंग लीडर्स’मध्ये करणची निवड करण्यात आली आहे.