जॉन स्टाइनबेक

जॉन स्टाइनबेक यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९०२ रोजी कॅलिफोर्नियातील सलिनास इथे झाला. कॅलिफोर्नियाच्या खोऱ्यातील सुपीक भागात वसलेलं सलिनास हे टुमदार छोटेखानी शहर पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यापासून सुमारे अवघं २५ मैल दूर असून पुढील काळात स्टाइनबेक यांनी सर्जनशील लेखन सुरू केलं. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांना सलिनास आणि पॅसिफिकचा किनारा दोहोंची पार्श्वभूमी असल्याचं आढळून येतं. १९१९मध्ये स्टाइनबेक यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, जरी त्यांनी तिथे साहित्य आणि लेखनासंदर्भातील अभ्यासक्रम पार पाडण्यासाठी अधूनमधून प्रवेश घेतला, तरी १९२५मध्ये कोणतीही पदवी घेतल्याविनाच ते विद्यापीठातून बाहेर पडले. पुढील पाच वर्षं न्यू यॉर्कमध्ये पत्रकारिता व मोलमजुरी करून त्यांनी आपला चरितार्थ साधला.
स्टाइनबेक यांनी आपल्या साहित्यिक कारकीर्दीत अविरत प्रयोग केले आणि वेगवेगळे मार्ग चोखाळून पाहिले. १९३०च्या दशकात त्यांनी कॅलिफोर्नियातील मजूरवर्गाचं जीवन टिपणाऱ्या पुढील तीन सशक्त कादंबऱ्या - ‘इन ड्युबिअस बॅटल' (१९३६), ‘ऑफ माइस अँड मेन' (१९३७) आणि त्यांची सर्वोत्तम अशी समजली जाणारी कादंबरी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ' (१९३९) यांची निर्मिती केली. त्यानंतरही त्यांनी आपलं लेखन अविरत सुरू ठेवलं.
त्यांच्या आयुष्याचं अखेरचं दशक त्यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीसह न्यूयॉर्क शहर आणि सेग हार्बर इथे व्यतीत केलं. तिच्यासोबत त्यांनी विविध ठिकाणी बराच प्रवास केला. १९६२मध्ये जॉन स्टाइनबेक यांना ‘नोबेल पुरस्कारा'ने गौरवलं गेलं. २० डिसेंबर १९६८ रोजी या थोर साहित्यिकाचं निधन झालं.

लेखकाची पुस्तकं

द ग्रेप्स ऑफ रॉथ

विस्थापित-स्थलांतरितांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरी


जॉन स्टाइनबेक
अनुवाद: मिलिंद चंपानेरकर


लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे.

भांडवलकेंद्री मोठ्या शेतीच्या धोरणाच्या पुरस्कारार्थ मध्य अमेरिकेतील लाखो लहान-मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवरुन हुसकावून लावलं गेलं… पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कापसाच्या, द्राक्ष-संत्र्याच्या बगिच्यांमध्ये काम मिळेल, या आशेने या विस्थापित कुटुंबांनी दोन हजार मैलांचा खडतर प्रवास करून केलेलं स्थलांतर… त्या प्रक्रियेत वाट्याला आलेलं दैन्य, निर्वासित छावण्यांमधील भीषण अमानवी जीवन आणि उद्धवस्थता…
आणि याच प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जाणिवेत घडून आलेले सूक्ष्म बदल आणि आत्मिक क्षोभाची भावना…
एक विशाल बहुपेडी पट उलगडून दर्शविणारी ही एक हृदयस्पर्शी कादंबरी.

सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्टयांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद.

लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.


700.00 Add to cart