जॉन स्टाइनबेक
जॉन स्टाइनबेक यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९०२ रोजी कॅलिफोर्नियातील सलिनास इथे झाला. कॅलिफोर्नियाच्या खोऱ्यातील सुपीक भागात वसलेलं सलिनास हे टुमदार छोटेखानी शहर पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यापासून सुमारे अवघं २५ मैल दूर असून पुढील काळात स्टाइनबेक यांनी सर्जनशील लेखन सुरू केलं. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांना सलिनास आणि पॅसिफिकचा किनारा दोहोंची पार्श्वभूमी असल्याचं आढळून येतं. १९१९मध्ये स्टाइनबेक यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, जरी त्यांनी तिथे साहित्य आणि लेखनासंदर्भातील अभ्यासक्रम पार पाडण्यासाठी अधूनमधून प्रवेश घेतला, तरी १९२५मध्ये कोणतीही पदवी घेतल्याविनाच ते विद्यापीठातून बाहेर पडले. पुढील पाच वर्षं न्यू यॉर्कमध्ये पत्रकारिता व मोलमजुरी करून त्यांनी आपला चरितार्थ साधला.
स्टाइनबेक यांनी आपल्या साहित्यिक कारकीर्दीत अविरत प्रयोग केले आणि वेगवेगळे मार्ग चोखाळून पाहिले. १९३०च्या दशकात त्यांनी कॅलिफोर्नियातील मजूरवर्गाचं जीवन टिपणाऱ्या पुढील तीन सशक्त कादंबऱ्या - ‘इन ड्युबिअस बॅटल' (१९३६), ‘ऑफ माइस अँड मेन' (१९३७) आणि त्यांची सर्वोत्तम अशी समजली जाणारी कादंबरी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ' (१९३९) यांची निर्मिती केली. त्यानंतरही त्यांनी आपलं लेखन अविरत सुरू ठेवलं.
त्यांच्या आयुष्याचं अखेरचं दशक त्यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीसह न्यूयॉर्क शहर आणि सेग हार्बर इथे व्यतीत केलं. तिच्यासोबत त्यांनी विविध ठिकाणी बराच प्रवास केला. १९६२मध्ये जॉन स्टाइनबेक यांना ‘नोबेल पुरस्कारा'ने गौरवलं गेलं. २० डिसेंबर १९६८ रोजी या थोर साहित्यिकाचं निधन झालं.