एलियाहू एम. गोल्ड्रेट

डॉ. एलियाहू एम. गोल्ड्रेट यांचं 'द गोल' हे पुस्तक व्यवस्थापन क्षेत्रातल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक मानलं जातं. 'द गोल' या पुस्तकाची जपानी आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर वर्षभरातच त्याच्या पाच लाख प्रती विकल्या गेल्या. '१९८४मध्ये लिहिली गेली असूनही मॅनेजमेंटबद्दलचा आपला विचार बदलणारी मॅनेजमेंट विषयावरची सर्वाधिक प्रभावी २५ पुस्तकं' या 'टाईम'च्या विशेष यादीत 'द गोल' हे नाव आहे. एलि गोल्ड्रेट (१९४७-२०११) यांनी अनेक पुस्तकं लिहिली. काही अशी 'इट्स नॉट लक' ('द गोल'चा उत्तरार्ध), 'क्रिटिकल चेन', 'नेसेसरी बट नॉट सफिशियंट' आणि 'इजंट इट ऑव्हियस'. ती २७ भाषांतून अनुवादित झाली असून, त्यांच्या जगभरात ६० लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. भरभराट होणारा व्यवसाय आकाराला आणणं आणि अर्थपूर्ण आयुष्य जगणं यासाठी पाया ठरणाऱ्या तात्विक तत्त्वांचं स्पष्टीकरण 'द चॉईस' या पुस्तकातून मिळत असल्याने ते त्यांचं सर्वांत महत्त्वाचं पुस्तक आहे असं ते म्हणत. एलि गोल्ड्रेट हे अध्यापक, लेखक, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ आणि व्यावसायिक अग्रणी होते. त्याही आधी ते विचारवंत होते. ते इतरांना विचार करायला भाग पाडत. आपल्या श्रोत्यांनी नव्या दृष्टिकोनातून आपल्या व्यावसायिक पद्धती तपासाव्यात, त्यांचं पुनर्मूल्यांकन करावं यासाठी डॉ. गोल्ड्रेट प्रोत्साहन देत. संस्थांना आणि व्यक्तींना पुढील बाबींकरता सरसकट चौकट करणं शक्य व्हावं म्हणून त्यांनी 'थिअरी ऑफ कन्स्ट्रेन्ट्स' (टीओसी) निर्माण करून विकसित केली- काय बदलायचं- लाभ बिंदू (लिव्हरेज पॉइंट) शोधून तो वापरणं. कशात बदलायचं साधा व्यवहार्य उपाय निर्माण करणं. बदल कसा घडवून आणायचा सुरक्षित आणि स्थिर सुधारित वातावरण तयार करणं, डॉ. गोल्ड्रेट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी व्यावसायिक व्यवस्थापकीय तत्त्वं आणि प्रणाली विकसित करणारे अग्रणी म्हणून ओळखले जातात. जनरल मोटर्स, प्रॉक्टर अॅन्ड गॅम्बल, एटी अॅन्ड टी, एनव्ही फिलिप्स, एबीबी आणि बोईंगसारख्या जगातल्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेशन्सना त्यांनी उत्तम प्रकारे प्रशिक्षित केलं. ते भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी तेल अविव विद्यापीठातून विज्ञान पदवी, तसंच बार-ईलान विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट प्राप्त केली. 'व्यवसाय व्यवस्थापन' या विषयाचा पायंडा त्यांनी पाडला. शिक्षक आणि मुलं यांच्यापर्यंत टीओसीचे आदर्श पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या, विना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या 'टीओसी फॉर एज्युकेशन' (www.tocforeducation.com) या संस्थेचे ते संस्थापक होते. अवराहम वाय. गोल्ड्रेट इन्स्टिट्यूटमधून १९९०च्या मध्यावर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 'गोल्ड्रेट कन्सल्टिंग' ही संस्था स्थापन केली. उत्पादन, पुरवठा आणि वितरण, प्रकल्प व्यवस्थापन आणि रिटेल, निर्णयप्रक्रियेचा दर्जा उंचावणं, संवादकौशल्य सुधारणं, नवीन उपायांना चालना देणं आणि कंपन्यांची सतत भरभराट करणं या सर्व स्तरांवर व्यवसायवृद्धी करण्याकरता टीओसीला संस्था व्यवस्थापनात अध्वर्यु करणं हा त्यांचा त्यामागचा विचार होता. 'व्हाएबल व्हिजन'च्या माध्यमातून त्यांनी आयुष्यातली शेवटची दहा वर्ष सल्लागार म्हणून कार्य करत विकासाला सातत्याने हातभार लावला. एलि गोल्ड्रेट यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी- www.goldrattconsulting.com