डॉ. सविता नायक मोहिते

डॉ. सविता नायक-मोहिते यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण (एम.बी.बी.एस. व एम.डी.) ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज, मुंबई येथून पूर्ण केलं. वैद्यकीय शिक्षण व पेशा आणि ग्रामीण भागाशी संपर्क यामुळे ग्रामीण स्त्रियांच्या आरोग्यविषयक व इतर समस्या यांचं त्यांना जवळून दर्शन झालं. त्यात मनही संवेदनशील... यामुळे त्या साहजिकच सामाजिक कार्याकडे आकृष्ट झाल्या. गेली अनेक वर्ष त्या विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी असतात. तसंच काही उपक्रम सुरू करण्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. कुटुंब नियोजन, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार, महिलांवर होणारे अन्याय असे अनेक सामाजिक विषय त्यांच्या आस्थेचे आहेत. त्याचप्रमाणे, 'मिळून साऱ्याजणी', 'विचार भारती', 'मृण्मयी' या आणि अशा अनेक नियतकालिकांमधून व 'सकाळ', 'लोकमत' अशा वृत्तपत्रांमधून त्यांनी सामाजिक विषयांवर विपुल लेखन केलं आहे. चित्रपट या प्रभावी माध्यमाविषयीची जाण अधिक प्रगल्भ व्हावी या दृष्टीने त्यांनी फिल्म अॅप्रिसिएशन कोर्सही केला आहे.