डॉ. संजय गुप्ते

एमबीबीएस - १९७३, डीजीओ, एमडी १९७७ बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे विद्यापीठ; एलएलबी - १९९४. पदवीपूर्व शिक्षक म्हणून ११ वर्ष व असोसिएट प्रोफेसर म्हणून १० वर्ष बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे विद्यापीठ येथे कार्यरत. १९८० पासून गुप्ते हॉस्पिटल, भांडारकर रोड, पुणे येथे स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ म्हणून ४४हून अधिक वर्ष नीतिमत्तेने कार्य करून हजारो महिलांना सुरक्षित आणि निरोगी मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यात मदत केलेली आहे. आपल्या समृद्ध अनुभवात्मक ज्ञानाची संपत्ती अद्ययावत करण्याच्या आग्रहाने सतत प्रेरित डॉ. गुप्ते यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर १५०० हून अधिक शोधनिबंधांचं लेखन आणि सादरीकरण केलं आहे. विविध वैद्यकीय पैलूंवर सुमारे आठ पुस्तकं आणि इतर प्रतिष्ठित पुस्तकांमधील ५०० प्रकरणं त्यांनी लिहिलेली आहेत. डॉ. संजय गुप्ते हे वर्ल्ड ऑर्गनायझेशन जेस्टोसिसचे (World Organization Gestosis) सेक्रेटरी जनरल असून त्यांनी ४० वर्ष जुन्या या संस्थेचं, गर्भावस्थेतील उच्च रक्तदाबाच्या आजारांवर संशोधनासाठी जागतिक स्तरावर नेतृत्व केलं आहे. FIGO (आंतरराष्ट्रीय स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र महासंघ) मधील मानवी पुनरुत्पादन आणि महिलांच्या आरोग्याच्या नैतिक आणि व्यावसायिक बाबी हाताळणाऱ्या कमिटीचे माजी अध्यक्ष आहेत. ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) तांत्रिक संशोधन माजी अध्यक्ष आहेत. FOGSI (फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया) चे ते माजी अध्यक्ष आहेत. यांच्या अध्यक्षपदाखाली FOGSI ने भारत सरकार, IAP (इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) NNF (नॅशनल निओनेटोलॉजी फोरम) यांच्या सहकार्याने 'मदर अॅड न्यूबॉर्न इंडिया प्रोजेक्ट' हे राष्ट्रीय उपक्रम सुरू केले आहे. सुरक्षित मातृत्वासाठी GOIचा कार्यक्रम, जननी आणि शिशु सुरक्षा कार्यक्रम या उपक्रमावर आधारित आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रीरोग प्रसूतितज्ज्ञांसाठी विविध आव्हानात्मक वैद्यकीय प्रसंगांना सामोरं जाताना पाळावायची मार्गदर्शक तत्त्वं (Good Clinical Prac-tice Recommendations) अमलात आणली गेली ज्यात रुग्णांच्या सुरक्षिततेचे संरक्षण, उपचारांची गुणवत्ता, आणि नैतिक जबाबदारी यांचं आंतरराष्ट्रीय मानकांसह पालन केलं जातं. ज्यामुळे उपचारांमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सुरक्षितता यांची खात्री होते. Diabetes In Pregnancy Study Group - India (DIPSI) चे देखील ते माजी अध्यक्ष आहेत. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत सशस्त्र सेना संशोधन समितीचेदेखील ते सदस्य होते. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे माजी अध्यक्ष व कौन्सिलच्या नैतिकता समितीचे माजी अध्यक्ष ही पदेदेखील त्यांनी भूषविली आहेत. कायद्याचं प्रशिक्षण घेतल्याने, वैद्यकीय कायदेशीर परिषदा सुरू करण्यामध्ये त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारतातील सर्वांत प्रेरणादायी डॉक्टरांसाठी पुरस्कार २०१८. टाइम्स हेल्थ आयकॉन पुणे २०१७ हे त्यांना मिळालेले आहेत. लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनकोलॉजीने, स्त्रीआरोग्य सेवा विकासासाठी केलेल्या कार्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणजे "Honoris Cusa" या फेलोशिपने त्यांना २०१० मध्ये सन्मानित करण्यात आलेलं आहे. स्त्रियांच्या आरोग्य समस्यांबद्दल त्यांच्या अप्रतिम सेवेसाठी FOGSIकडून लाइफटाइम अचिव्हमेंट (जीवन गौरव) पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक कार्य- डॉ. गुप्ते हे सध्या 'अस्मिता मेडिकल फाउंडेशन' या समाजाच्या सर्व स्तरांतील मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी कार्यरत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत आजपर्यंत एक लाखहून अधिक मुलींना लाभ झालेला आहे. डॉ. गुप्ते हे ग्रीनॲरे जिनॉमिक रिसर्च अँड सोल्युशन्सचे संचालक आहेत - रुग्ण आणि चिकित्सकांना विस्तृत आणि अचूक जनुकीय चाचण्या तसेच जिनॉमिक्समधील संशोधन प्रदान करण्यासाठी ही समर्पित प्रयोगशाळा आहे.