डॉ. सो.स. बुरकुले
डॉ. सो. स. बुरकुले यांनी मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९५७मध्ये बी. एस्सी. (व्हेट.) पदवी घेतल्यानंतर ते महाराष्ट्र शासनातर्फे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून उंझा या गावी शासनसेवेत रुजू झाले. १९६०मध्ये गुजरात- महाराष्ट्र ही राज्यं वेगळी झाल्यावर महाराष्ट्रात त्याच पदावर, जत (सांगली) येथे त्यांची बदली झाली. १९६२ ते १९७६ या काळात आरे मिल्क कॉलनी, मुंबई येथे दुग्धविकास खात्याच्या निरनिराळ्या पदांवर काम त्यांनी केलं. त्याच वेळी १९६७- ६९ या काळात मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर अभ्यास (अॅनिमल जनेटिक्स) करून प्रथम श्रेणीत एम. व्ही. एस्सी. पदवी मिळवली. त्यांनी महाराष्ट्र शासनात प्रथमवर्गीय अधिकारी म्हणून काम केलं आणि ते उपसंचालक पदावर निवृत्त झाले. जेनेटिक्स, अॅनिमल डिसीजेस, दुधाळू जनावरांचे रोग, दुग्ध व्यवसायातील निरुपयोगी बाबींचा (डेअरी वेस्ट) उपयोग इ. विषयांवर त्यांनी एकूण १९ शोधनिबंध लिहिले असून ते विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत.