डॉ. रोहिणी पटवर्धन
डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी पीएच.डी. (पुणे विद्यापीठ), जाहिरातकलेतील एम.फिल, बी.कॉम एम.कॉम., बॅचलर ऑफ जर्नालिझम, डिप्लोमा इन जेरोन्टोलॉजी (टाटा सामाजिक विज्ञान संस्था), डिप्लोमा इन हायर एज्युकेशन ही शैक्षणिक अहर्ता प्राप्त केली आहे. ‘सनवल्र्ड सोसायटी फॉर सोशल सव्र्हिस’ या संस्थेच्या त्या संस्थापक असून त्यांना ३५ वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. त्या सध्या एम.आय.टी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांच्या आयोजनामध्ये सहभाग असून त्या प्रभाकर पाध्ये, कमल पाध्ये ट्रस्टच्या विश्वस्त आहेत.
डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला त्यामुळे त्यांना शेतीची आवड असून त्या सध्या शेती करतात. त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’, ‘हंस’, ‘नवल’ इ. नियतकालिकांमधून कथा व ललित लेखन केले आहे. त्यांना स्वतंत्रपणे भटकंती, वाचन, शास्त्रीय संगीताची आवड आहे.
त्यांना २०१६चा टाईम्स ऑफ इंडिया समुहाचा ‘प्रमाण सिनियर्स' पुरस्कार तसंच, २०१६चा अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटनेचा ‘वात्सल्य' पुरस्कार मिळाला आहे.
डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी वृद्धकल्याणशास्त्र या वृद्धांशी संबंधित असणाऱ्या विषयावर संशोधन करून पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. ‘वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्यासाठी ज्येष्ठांनी ‘आपल्यासाठी आपणच’ या तत्त्वाचा स्वीकार करणं आवश्यक आहे’, अशा अगदी वेगळ्या विचारांच्या त्या पुरस्कर्त्या आहेत. सनवर्ल्ड फॉर सिनियर्सच्या माध्यमाद्वारे परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण एकांकिका स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित करून या तत्त्वाचा त्या अत्यंत तळमळीने प्रसार करतात.