डॉ. प्रबोध चोबे
पेशाने शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. प्रबोध चोबे यांचं पदवीपूर्व शिक्षण पवई येथील आय.आय.टी.मधून झालं. पुढे त्यांनी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क येथून ‘ऑरगॅनोमेटॅलिक रसायनशास्त्र’ या विषयात डॉक्टरेट मिळवली. गेल्या दोन दशकांहून जास्त काळ ते एका मोठ्या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीच्या संशोधन केंद्राची धुरा वाहत आहेत.
डॉ. चोबे यांचा आवडता छंद म्हणजे आपल्या लेखनातून व व्याख्यानांमधून कोणताही शास्त्रीय विषय मराठीमधून सहज समजेल अशा भाषेत, सोप्यात सोपा करून मांडणं. आजवर त्यांची पाच पुस्तकं व विविध मराठी नियतकालिकांमधून ६००च्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणं, विज्ञानाबद्दल- नवीन संशोधनाबद्दल त्यांचा उत्साह वाढवणं, देशासाठी भरीव संशोधन करायला त्यांना उद्युक्त करणं, प्राध्यापकांना संशोधन विषयात मार्गदर्शन करणं असे विविध उपक्रम डॉ. चोबे आवडीने करतात. डॉ. चोबे यांची व्याख्यानं त्यांच्या रसायनशास्त्रामधील आधुनिक विषयांवरील सखोल व्याख्यानांइतकीच लोकप्रिय आहेत व त्यासाठी ते भारतभर अविरतपणे फिरत असतात.
डॉ. चोबे यांना आजवर अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या पुस्तकाला राज्य पुरस्कारही मिळाला आहे. शालेय जीवनात त्यांना ‘प्रेसिडेंट्स स्काऊट’ हा सर्वोच्च सन्मान तत्कलीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात आला होता.