डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले

डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले या १९९०च्या दहावी व १९९२च्या बारावी परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम आल्या आहेत. त्यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. हॉस्पिटल इथून एम.बी.बी.एस. आणि एम.एस. जनरल सर्जरीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी मुंबईतील बाई जेरबाई चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, या प्रख्यात हॉस्पिटलमधून एम.सी.एच.पेडियाट्रिक सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे इथे १३ वर्षं बालशस्त्रक्रियातज्ज्ञ म्हणून काम केलं असून मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये सहयोगी प्राध्यापक व पेडियाट्रिक सर्जरी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्या बाललैंगिक अत्याचारावर पॉक्सो कायद्याअंतर्गत पालक-शिक्षकांसाठी व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन करतात. शिवाय सदर विषयावर जनजागृतीसाठी मराठी व इंग्रजीमधून पुस्तिकांचं लेखन करतात. अत्याचारग्रस्त बालकांवर प्रत्यक्ष उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना अनुभव असून लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांच्या उपचारासाठी तज्ज्ञ भारतीय डॉक्टरांच्या पथकामध्ये त्यांचा समावेश असतो.