डॉ. अलका कुलकर्णी

डॉ. अलका शशांक कुलकर्णी यांचा जन्म सांगली येथला, ३ एप्रिल १९५१ सालचा. त्यांनी मुंबईमधून MBBS, MD या पदव्या संपादित केल्या असून बालआरोग्य या विषयाच्या त्या तज्ज्ञ आहेत. १९७८ पासून त्या धुळे जिल्ह्यातील शहादा येथे आपल्या पतीसोबत वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. तिथे १९८५मध्ये त्यांनी दहा खाटांचं हॉस्पिटल व अर्भक विशेष दक्षतागृह सुरू केलं तर, २००४ सालामध्ये वाढवून ते पन्नास खाटांचं हॉस्पिटल केलं. २००६ मध्ये त्यांनी त्यात व्हेंटिलेशन विभाग सुरू केला. व्यक्त होण्याच्या तीव्र इच्छेतून अलका कुलकर्णी यांनी १९९१ पासून लेखनाला प्रारंभ केला आणि आजपर्यंत त्यांचे तीन कथासंग्रह आणि पाच कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. 'माझी डॉक्टरकी' हा आत्मअनुभवपर संग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. त्यांना 'गिरीजा कीर कथालेखन पुरस्कार', 'शतायुषी पुरस्कार', 'दीर्घायू पुरस्कार', मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदा यांचा 'अभिरुची गौरव पुरस्कार', 'लोकमत सखी सन्मान', डॉक्टर सोनी फाऊंडेशन दोंडाईचा 'श्रम साफल्य पुरस्कार' (समाजसेवा), पुणे मराठी ग्रंथालयाचा 'शारंगपाणी पुरस्कार', साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा 'कै. मालतीबाई दांडेकर पुरस्कार' असे आजवर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.