ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर

ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर माणसांतील जगण्याच्या प्रेरणांचा शोध घेणं हा ज्ञानेश्वरचा आवडता छंद. या छंदासाठी तो हरतऱ्हेच्या माणसांना भेटायला उत्सुक असतो. त्यांचं जगणं समजून घ्यायला त्याला आवडतं. निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडी, जंगल यांच्यातही तो रमतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो. वेगवेगळ्या अनुभवांच्या शोधात तो गावोगावी फिरत असतो. या फिरण्यात त्याला जे सापडतं ते त्याला कधी विसरून जावंसं वाटतं तर कधी गोष्ट रूपाने मांडावंसं वाटतं. स्वत:चं जगणं, सोबतच्यांचं जगणं आणि अवतीभवती घडणारे प्रसंग हे सर्व म्हणजेच त्याची पहिली कादंबरी - 'यसन' असं त्याचं म्हणणं. जगतांना मनात उद्भवणारे विचारच त्याला लिहिण्यास प्रवृत्त करतात. स्वत:च्या जगण्यासोबत समूह म्हणून जगण्यातला माणसाचा तळही तो तपासत असतो, त्याच्या नोंदी करत असतो. विविध मानवी समूहांच्या नोंदी करतांना तो खूप काही शिकत असतो, असं त्याला वाटतं. त्या शिकण्यातूनच 'यसन', 'लॉकडाउन', 'कूस' आणि 'चंबूगबाळं' या कादंबऱ्या तयार झाल्या. या कादंबऱ्यांसोबत अनेक एकांकिका, नाटकं, कथा त्याने लिहिल्या आहेत. त्याशिवाय शरद पवार फेलोशिप, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईचा युवा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा श्री. ना. पेंडसे प्रथम प्रकाशन पुरस्कार, आपटे वाचन मंदिर पुरस्कार, कुंडलकृष्णाई प्रतिष्ठानचा पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवर संस्थांकडून दिले जाणारे पुरस्कार त्याला त्याच्या साहित्यासाठी मिळाले आहेत.

लेखकाची पुस्तकं

Explore Other Authors