सी.पी. श्रीवास्तव

चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म ८ जुलै १९२० रोजी झाला. लखनौ येथून एम.ए. व एलएल.बी. पदवी त्यांनी प्रथम वर्गात संपादन केली. आय.ए.एस. झाल्यावर केंद्र सरकारच्या वाणिज्य खात्यात रुजू झाल्या. १९५३ पासून त्यांनी नौकानयन खात्यात विविध पदांवर काम केलं. १९६१मध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती. १९६४ ते १९६६ या काळात पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे संयुक्त सचिव, अर्थात या काळातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचे साक्षीदार. ऐतिहासिक ताश्कंद शिखर परिषदेच्या वेळी ते शास्त्रींच्या समवेत उपस्थित होते. नौकानयनविषयक अनेक भारतीय व जागतिक संघटनांचे ते सदस्य आहेत. १९७२मध्ये भारत सरकारने त्यांचा ‘पद्मभूषण' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. स्वीडन, नॉर्वे व स्पेन या देशांच्या सरकारांनी त्यांना विविध किताब देऊन सन्मानित केले आहे. इंग्लंडच्या राणीने के.सी.एम.जी. हा किताब देऊन त्यांचा बहुमान केला आहे.