आनंद नीलकठंन

आनंद नीलकठंन हे लेखक, पटकथा लेखक, स्तंभलेखक असून दूरदर्शनवर अनेकदा असतात. भारतीय पुराणांचा त्यांनी लावलेला वैशिष्ट्यपूर्ण अर्थ लोकप्रिय आहे. भारताच्या नैऋत्य किनाऱ्यावरच्या केरळ इथल्या त्रिपूनिथुर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला आहे. वेम्बनाड तलावाच्या काठाशी वसलेलं हे गाव कोचीनच्या राजघराण्याचं स्थान होतं. इथे अनेक मंदिरं, अनेक शाखीय गायक, स्थानिक संगीत विद्यालयं आहेत. मात्र काळाच्या ओघात आणि आखाती देशातून येणाऱ्या पैशांमुळे इतर अनेक गावांप्रमाणेच याही गावाचं रूपांतर ओळखू न येणाऱ्या उपनगरात झालं. कोणे एकेकाळी निसर्गरम्य परिसर असणाऱ्या गावाचा आज कुठेही पत्ता नाही. मंदिरांच्या गावात वाढलेल्या आनंद यांचा परिचय पुराण आणि आख्यान, असुर आणि देव, नायक आणि खलनायक, पापी आणि पुण्यवान यांच्याशी वयाच्या फार अलीकडच्या टप्प्यावर झाला. वर्षानुवर्षं लोटली. आनंद यांनी शिक्षण पूर्ण केलं. ते इंजिनिअर झाले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन इथे नोकरी लागून त्यांनी बंगळुरू इथे मुक्काम हलवला. तिथेच त्यांची भेट अपर्णा हिच्याशी झाली. दोघांनी विवाह केला. अनन्या आणि अभिनव ही त्यांची दोन मुलं होय. आनंदमधला कथाकार मात्र त्यांना गप्प बसू देत नव्हता. भारतीय महाकाव्यांतल्या अज्ञात नायक आणि आख्यायिकांमधले खलनायक यांचे ऐकू न गेलेले आवाज त्यांच्या कानात कुजबुजत होते; त्यांनी लिखाणास प्रवृत्त व्हावं म्हणून त्यांना प्रेरित करत होते. दिवसभर कार्यालयात काम केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बसून त्यांनी तब्बल सात वर्षांच्या कालावधीत आपली पहिली कादंबरी असुर (२०१२) पूर्ण केली. भारतीय प्रकाशन क्षेत्रात ती एका वादळाप्रमाणे येऊन आदळली. दैवत्व आणि खलनायकत्व, बरोबर आणि चूक यामधल्या पूर्वकल्पित समजांचा तिने धज्जा उडवला. आजही ती कादंबरी हातोहात खपते. अनेक भाषांमधून तिचा अनुवाद झाला आहे. स्वतःच निर्माण केलेल्या भोवऱ्याने आनंदही झपाटले गेले. लिहिणं आणि कथा सांगणं हा त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला. आपलं पूर्वीचं जीवन मागे टाकत त्यांनी मुंबईत शिरकाव केला. पाहता पाहता लेखक म्हणून त्यांचा जम बसला. प्रिंट आणि स्क्रीन या दोन्हींमध्ये ते गाजू लागले. आता तर श्राव्य स्वरूपातही त्यांचं लेखन गाजत आहे. मौन राहिलेल्या अनेक व्यक्तिरेखांना आता आवाज प्राप्त झाला आहे. 'असुर' या पुस्तकातून रावणाच्या दृष्टीने रामायण पाहिलं गेलं आहे. 'अजय' या पुस्तकात दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून महाभारत पाहिलं गेलं आहे. 'वानर' या पुस्तकातून वाली आणि सुग्रीवाची कथा समोर येते. 'सीया के राम' आणि 'महाबली हनुमान' या दोन्हीचं लेखन टी. व्ही. साठी झालं असून त्यात सीता आणि हनुमान यांचे दृष्टिकोन अनुक्रमे दर्शविलेले आहेत. आनंद यांनी 'बाहुबली' ही तीन कादंबऱ्यांची मालिका लिहिली असून, सगळे विक्रम मोडणाऱ्या बाहुबली सिनेमांपूर्वीच ती बाजारात आली आहे. ते कथा, ऐतिहासिक कादंबऱ्या आणि मुलांची पुस्तकंही लिहितात.