“स्पृहा, तुला माझी नवीन कादंबरी पाठवायची आहे. पत्ता पाठव.” – प्रणवचा काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आलेला मेसेज. मला फारच भारी वाटलेलं. मराठीतला आजच्या महत्त्वाच्या लेखकांमध्ये गणला जाणारा हा माणूस कॉलेजची जुनी ओळख लक्षात ठेवून मला पुस्तक पाठवतोय! आणि मग तीन-चार दिवसांत माझ्या हातात पडलं – ‘काळेकरडे स्ट्रोक्स’. प्रणवचं नवंकोरं पुस्तक. हातात पडल्यावर अधाशासारखं वाचून संपवलं.

आणि मग तीन-चार दिवसांत माझ्या हातात पडलं – ‘काळेकरडे स्ट्रोक्स’. प्रणवचं नवंकोरं पुस्तक. हातात पडल्यावर अधाशासारखं वाचून संपवलं.

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा रंग करडा आहे. काळपट… आणि ही कादंबरी वाचताना तो करडा रंग आपल्या आत आत वाढायला लागतो आणि घुसमटून जायला होतं. या अशा फीलिंगचं काही नक्की नाव नाहीये बहुतेक, पण ज्या अर्थी ते इतकं ठोसपणे जाणवतं, त्या अर्थी ते असणार, खरंच असणार! त्या अगम्य फीलिंगने मला पूर्णपणे घेरून टाकलं.
या कादंबरीचा संपूर्ण परिसर माझा आहे, माझ्या ओळखीचा, सवयीच्या वाटेचा – रुईया कॉलेजचा आहे. ते ठराविक स्पॉट्स, कट्टा, नाक्याची वर्णनं, डीपीजपासून गुलशनपर्यंत आणि कॅफे कॉलनीपासून फाइव्ह गार्डनपर्यंतचा परिसर हे सगळं खूप ‘माझं’ आहे. कादंबरीतल्या पात्रांना मी ओळखते की काय इतकं साम्य जाणवलं आणि थोडीशी भीतीच वाटली. त्या वयात रुईया कॉलेजमध्ये घालवलेल्या दिवसांना कुणीतरी स्कॅन केलंय असं वाटलं. इतके ते लोक माझ्या माहितीचे वाटले. खूप काही घडून गेलं त्या वर्षांमध्ये… मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्यांपासून २६ जुलैला मुंबई बुडण्यापर्यंत.
पण बाहेर ही वादळं चालू असताना आमची छोट्याशा परिघातली आयुष्यं निवांत चालू होती. त्याची डायरेक्ट झळ आम्हाला पोचत नव्हती. अर्थात हेही पूर्णपणे खरं नाहीये म्हणा… त्या वयातले ते झटके आमच्या छोट्या परिघातही मोठी मोठी वादळं नाही, पण भोवरे मात्र नक्की तयार करून गेले.

ATTACHMENT DETAILS  Kalekarde-strokesBC
काळेकरडे स्ट्रोक्स : मलपृष्ठ

अनेक कॉम्प्लेक्सेस, न्यूनगंड, त्यावर मात करण्यासाठी सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टने आतून सुचत गेलेले काही मार्ग, क्लृप्त्या…पळवाटा…भेलकांडणं..धडपडणं…पुन्हा उठणं, पुन्हा पडणं… ‘आपण महत्त्वाचे आहोत’ ते ‘आपल्याला या जगात काडीचीही किंमत नाही’ पर्यंत, आणि ‘एक दिवस हे जग बदलून दाखवीन’पासून ते ‘आपण नसलो तर कुणाचं काही घंटा अडत नाही’ इथपर्यंतचा हा प्रवास.. केवढं फिरवून आणलं या पुस्तकाने! केवढं दमवलं!

हे पुस्तक, ही कादंबरी आणि मी वरती लिहीत सुटलेले स्वैर विचार इतकं माझं रुईयातलं जग काळोखं होतं का? करडं होतं का? नव्हतं कदाचित…पण माझ्या आजूबाजूच्या अनेकांचं होतं. असे कित्येक ‘समीर’ उदासीच्या त्या गर्तेत हरवून जाताना आणि मुंबईच्या बिनचेहऱ्याच्या अजस्र गर्दीत ठिपका होऊन संपून जाताना मी पाहिलेत. त्यांची क्रिएटिव्हिटी, हुशारी त्यांनाच पेलली नाही आणि करियरच्या मासळीबाजारात, त्या गोंगाटात ते संपून गेले. त्यांच्या आठवणीने कोंदून जायला होतं.

नशीब हेच की, मला खूप छान सोबत मिळाली ती याच रुईयाच्या भवतालात. ‘ब्लाइंड सेल’मध्ये राम, योगिता भेटले, VPMमध्ये निळे सर भेटले, समजून घेणारे कितीतरी शिक्षक भेटले. ‘नाट्यवलय’ने तर आयुष्याची दिशाच बदलून टाकली. आणि मराठी वाङ्मय मंडळात हा सगळा कोलाहल मांडणारा प्रणवही भेटला. माझे कॉलेजचे दिवस- प्रणव, या सगळ्यांमुळे मुंबईच्या पावसासारखे वाटतात मला. तुफानी, भिजवून टाकणारे, बेदरकार… काळेकरडे स्ट्रोक्स…!!

– स्पृहा जोशी

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०१९


रोहन शिफारस

काळेकरडे स्ट्रोक्स

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते. या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात. मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ! खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही! कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनव्हासवरचे… समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड काळेकरडे स्ट्रोक्स !

250.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *