ल.सि. जाधव

‘होरपळकार’ म्हणून ल.सि. जाधव यांचं नाव महाराष्ट्राला सुपचिरित आहे. होरपळ हे त्यांचं पहिलं आत्मकथन खूप गाजलं आणि त्याचे चार भाषांमध्ये अनुवादही झाले. त्यानंतर त्यांनी होरपळचा पुढचा भाग – ‘सूळकाटा’ या नावे लिहिला आणि त्यालाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. आत्मकथनाबरोबर त्यांनी कादंबरी, कविता लेखनही केलं. त्यांनी बालसाहित्याची निर्मितीही केली. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबरच अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले.
वंचित समाजात जन्माला आल्यामुळे वाट्याला आलेलं दुःख, अवहेलना व झालेला अन्याय त्यांनी आपल्या लेखनातून संयतपणे मांडला. त्यामुळे त्यांचं लेखन आक्रस्ताळं न होता अंतर्मुख करणारं असतं. कायम लिहित्या असणाऱ्या या लेखकाचं जून २०१९मध्ये अकस्मात निधन झालं.

लेखकाची पुस्तकं

होरपळ

ल.सि. जाधव


सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामर्थ्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे.
साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ…


250.00 Add to cart

सूळकाटा


ल.सि. जाधव


प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात.
या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्रिस्तरीय आहे. पहिला स्तर हा मातंग समाजाची दुःख, त्यांना सोसावे लागणारे चटके आणि त्याबद्दल लेखकाला असलेली कळकळ याबद्दलचा आहे. दुसरा स्तर हा लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने घनव्याकूळ करणाNया दुःखाचा आहे. तर, लेखनाची निर्मितीप्रक्रिया आणि घरात तसेच समाजात लेखकाचं असलेलं स्थान याबद्दल केलेलं परखड भाष्य हा तिसरा आणि महत्त्वाचा स्तर…
हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं.
सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा… सूळकाटा !


250.00 Add to cart