डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते रोहन प्रकाशनाच्या नोबेल कथा पुस्तकाचे प्रकाशन...
दि. २९/८/२०१३, दादर, मुंबई
नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमी आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या विविध क्षेत्रात जगभरातल्या व भारतातल्या ४७ व्यक्क्तींचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या डॉ.प्रबोध चोबे लिखित रोहन प्रकाशनाच्या नोबेल कथा या पुस्तकाचं प्रकाशन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अभियंते आणि लेखक प्रदीप कुलकर्णी होते.
प्रकाशक प्रदीप चंपानेरकर यांनी हे पुस्तक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल व रोहन प्रकाशनाच्या दर्जेदार चरित्रांच्या परंपरेत महत्त्वाचे ठरेल असं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी ग्रंथनिर्मितीच्या प्रक्रियेमधील महत्त्वाचे पैलूही सांगितले.
लेखक डॉ.प्रबोध चोबे यांनी नोबेल पुरस्कृतांचे चरित्र लिहिण्यामागची भुमिका मांडली. बराच अभ्यास व संशोधन करून हा ग्रंथ साकार झाल्याचे सांगितले. वाचकांना सहज सोपं व प्रेरणादायी वाटतील अशा व्यक्तींची पुस्तकात त्यांनी निवड केली आहे.
प्रमुख वक्ते प्रदीप कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या सोप्या भाषेचे कौतुक केले. नोबेलच्या ११२ वर्षांच्या इतिहासात केवळ ७ भारतीयांना नोबेल मिळाले याची नाराजी व्यक्त करून त्याचे कारण भारतातली गरिबी व शिक्षणपध्दतीतल्या दोषांचे सांगितले. केवळ मार्कांना महत्त्व न देता शिक्षण पध्दतीने मुलांना विचार करायला शिकवलं पाहिजे असे त्यांनी सांगितले.
डॉ.अनिल काकोडकर म्हणाले - अधिक भारतीयांना जर नोबेल मिळवायचे असेल तर सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे. संशोधनाकडे वळलं पाहिजे व त्यासाठी झटलं पाहिजे. केवळ system ला दोष न देता स्वत: सुधारणा केल्या पाहिजेत. परदेशी स्थायिक असलेल्या कर्तृत्वान भारतीयांबद्द्ल बोलताना ते म्हणाले की त्यांना अशा भारतीयांचा अभिमानच वाटतो. पण केवळ पैसे कमावणं हे ध्येय न ठेवता आपल्या क्षेत्रातली आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा नक्की करावा असंही ते म्हणाले.
"नोबेल कथा" या पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||