‘करोना’चे दुष्परिणाम दैनंदिन जीवनावर अनेक प्रकारे झालेले जाणवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुलांचं शालेय शिक्षण...बंद असलेल्या शाळांमुळे मुलांवर एकंदरच झालेले परिणाम फार तीव्र आहेत. याचं कारण मुलांच्या शिक्षणाची रीतच बदलून गेलीय. पालकांनाही सर्वच बाजूने नव्याने विचार करावा लागतो आहे. मुलांचा अभ्यास आणि मोकळा वेळ याबाबतीत पालकांची भूमिका आणि जबाबदारी वाढली आहे. लेखिका रेणू दांडेकर यांनी प्रामुख्याने पालकांच्या मनातल्या पुढील प्रश्नांचा वेध या पुस्तकात घेतला आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांची आणि स्वत:ची मानसिकता कशी तयार करावी? शाळा मोबाइलफोनमध्ये आलेली असताना मुलांचं ‘स्क्रीनटाइम-व्यवस्थापन’ कसं करावं? ऑनलाइन शिक्षणात रंजकता आणि उपयुक्तता यांचा मेळ कसा घालावा? मोकळ्या वेळेत मुलांना सर्जनशील कामांत कसं गुंतवून ठेवता येईल? सोशल डिस्टन्सिंग पाळूनही मुलांना सामूहिक खेळांत कसं गुंतवता येईल? बदलत्या परिस्थितीत पालकांना नेमकेपणाने दिशा आणि मार्ग दाखवणारं पुस्तक... ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व !
रेणू दांडेकर : मुलांचा विकास, शिक्षण, पालकत्त्व या क्षेत्रात कार्यरत व विपुल लेखन. शहरातून चिखलगाव या खेड्यात जाणीवपूर्वक येऊन शिक्षणाचा वेगळा अर्थ शोधण्यासाठी प्रयत्न. शिक्षणातली सहजता, नैसर्गिकता जपण्यासाठी शाळेची वेगळी रचना करणाऱ्या शिक्षिका.