कर्नाटकातल्या एका लहानशा खेड्यातून बी.के.एस. अय्यंगार यांच्या कष्टप्रद जीवनप्रवासाला सुरुवात झाली. कुमारवयापासूनच त्यांना सुप्रसिद्ध योगतज्ज्ञ कृष्णमाचार्य यांचा सहवास लाभला व त्यांच्यात गुरु-शिष्य नातं निर्माण झालं. मात्र हे गुरु-शिष्य संबंध कायमच तणावपूर्ण राहिले, तरी अय्यंगारांनी मोठ्या जिद्दीने कृष्णमाचार्यांकडून योगविद्या शिकून घेतली.
भविष्य घडवण्यासाठी पुणे शहरात आल्यावर अय्यंगारांच्या जीवनाला वेगळं वळण लाभलं. या अनोळखी शहरात जम बसवायला अय्यंगारांना बराच संघर्ष करावा लागला... जणू काही ती त्यांची आणि योगविद्येची कसोटीच होती. आणि त्या संघर्षात ते यशस्वी झाले! त्यांची कीर्ती देशविदेशात पसरली. एवढी की, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग आणि अय्यंगार हे अतूट समीकरण तयार होऊन ‘अय्यंगार योग’ अशी जणू एक वेगळी शाखाच निर्माण झाली. अय्यंगारांनी निरामय आयुष्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवलं, विविध साधनांचा वापर सुचवून योग लोकप्रिय केला.
रश्मी पालखीवाला या अय्यंगारांच्या निकटवर्तीयांपैकी एक होत. या पुस्तकात त्यांनी अय्यंगार यांच्या जीवनातले चढ-उतार, त्यांचे स्वभावविशेष उत्कटतेने चितारले आहेत, तसंच योगसाधनेकडे पाहायचा गुरुजींचा दृष्टिकोन आणि त्यामागचं त्यांचं तत्त्वज्ञानही विशद केलं आहे.
जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत योगसाधना हा ध्यास असलेल्या हाडाच्या योगशिक्षकाचं चरित्र...योगाचार्य !