‘कोरडी शेतं, ओले डोळे’ हे आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या प्रश्नांवरील पुस्तक लिहितानाच्या प्रक्रियेतील दीप्ती राऊत यांच्या काही जिवंत आठवणी… महिला दिनाच्या निमित्ताने.

बातमीदारी करताना दोन अनुभव येतात. काही प्रसंगांत समोरच्या घटनेबद्दल तटस्थता बाळगणं गरजेचं असतं. विषयापासून थोडं अंतर राखलं तर तो प्रश्न अधिक व्यापक परिप्रेक्ष्यातून बघता येतो, मांडता येतो. काही वेळा घटनाच अशा असतात की, तुम्ही खोल खोल आत रुतत जाता. एकाच वेळी पत्रकार म्हणून त्या घटनेपासून अलगही असता, पण माणूस म्हणून त्या विषयात गुंततही जाता. ‘शेतकऱ्यांच्या विधवा’ या विषयात मी अशीच ओढली गेले; एक पत्रकार म्हणून, एक माणूस म्हणून आणि सर्वांत अधिक एक बाई म्हणून.
लख्खपणे आजही आठवतोय तो २००३ सालातला दिवस ! चांदवड तालुक्यातील रेडगावमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याची पहिली आत्महत्या झाली. लोकसत्ताची वार्ताहर म्हणून मी, ती कव्हर करण्यासाठी गेले. ग्रामीण भागातून आल्याने शेती, शेतकरी यांबाबत माझ्या रोमँटिक कल्पना नव्हत्या, परंतु त्यांच्या घरासमोरील अंगणातील लिंबाच्या झाडाला टांगलेलं रक्षेचं गाठोडं बघून जीव गलबलून गेला. त्यातच भर म्हणजे, जवळ उभ्या त्यांच्या आठ-दहा वर्षांच्या पुतण्याने त्या लिंबाकडे बोट दाखवून सांगितलं, इथंच फास घेतला काकानं. कडकडीत उन्हात नजरेनंच थंडावा देणारं ते लिंबाचं झाड त्या दिवशी जळजळीत ज्वाळा बनून छातीत घुसलं. मनात विचार आला, दररोज उठलं की, हे झाड समोर दिसणार आणि कायमच या घरातल्या मंडळींना फासावर लटकलेलं त्यांचं शव दिसणार. कल्पनेनेच पोटात कालकालव झाली, ते तर रोजच जगणार. शहरात आत्महत्या झालेली घरं विकण्याचा किंवा भाड्याचं असेल तर बदलण्याचा सोपा पर्याय असतो लोकांकडे. इथे हे घर, शेत विकण्याचा तोही पर्याय नाही. या विचारात असतानाच; तो आठ-दहा वर्षांचा पुतण्या म्हणाला, ‘‘काकी म्हणते हे झाड तोडून टाकायचंय आता.’’ हं… हा उपाय चांगला आहे. झाडाला लटकलेलं आपल्या पतीचं शव डोळ्यांसमोर घेऊन आयुष्य काढण्यापेक्षा झाड कापून टाकणं सोपं होतं, पण मनाला चिकटलेलं ते दृश्य आयुष्यभर भळभळती जखम बनून राहणार होतं.

 Koradi-Sheta-ole-dole blurb
शेतकरी विधवांच्या समस्या मांडणार्‍या ‘कोरडी शेतं..ओले डोळे’ पुस्तकाचं मलपृष्ठ

ओट्यावर सगळी पुरुषमंडळी बसली होती. बाकी पत्रकार त्यांच्याकडूनच माहिती घेत होते. बाई असल्याने मी नेहमीप्रमाणे या वेळीही घरात जाऊन बाईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दबकत त्या घरात पाऊल ठेवलं. अंधाऱ्या कोपऱ्यातलं तिचं रूप आजही विसरू शकत नाही. माझ्याच वयाची होती ती. वीस-बावीस कदाचित. तीस किलोही वजन नसेल. रडून रडून डोळेही आटले होते. मांडीवर सहा महिन्यांचं एक लेकरू आणि घरात आतबाहेर करणारं दिडेक वर्षांचं दुसरं. कसंबसं धीर करून दोन-तीन प्रश्न विचारले. किती थकबाकी होती, कोणत्या बँकेचं कर्ज होतं.. सर्व प्रश्नांची उत्तरं ‘माहीत नाही’ अशीच होती आणि तिचे ते अनुत्तरित प्रश्न माझ्या डोक्यात वळवळत राहिले ते पुढची तब्बल दहा वर्षं.
पुढे आयबीएन-लोकमतची पत्रकार म्हणून वार्तांकन करत असताना, शेतकरी आत्महत्या कव्हर करण्याची वेळ वारंवार येत होती. दंडुके घेऊन ‘अब कैसे लगता है?’ हा प्रश्न विचारणारे टीव्ही रिपोर्टर कायमच टिकेचे धनी होत असतात, विनोदाचा विषय होत असतात. परंतु, अशा प्रसंगांमध्ये हातात बूम आणि सोबत कॅमेरा घेऊन त्या घरात त्या माऊलीपुढे बसणं, तिच्या दु:खाचा आदर करत, तिच्या भावना सांभाळत तिला बोलतं करणं, तिचं नेमकं वाक्य, डोळ्यांतले अश्रू कॅमेऱ्यात टिपणं किती जिकीरीचं असतं, याची कल्पना बाहेरची मंडळी नाही करू शकत. शेवटी आपणही एक माणूसच असतो. बातम्यांच्या धबडग्यातही प्रत्येकातलं माणूसपण शिल्लक असतंच. त्यामुळे पतीच्या फोटोच्या अँगलमध्ये तिचा चेहरा टिपणं, दु:खात दिङ्मूढ झालेल्या त्या माऊलीला बोलतं करणं खूप खूप कठीण होतं. कितीही वेदनादायक असलं तरी तिचा फोटो, तिचं दृश्य, तिचं म्हणणं बातमीच्या दृष्टीने गरजेचंच असतं. ते टाळून बातमी करणं अशक्य; पण ते सारं क्लेशदायकच होतं. त्यात वार्ताहरांच्या संवेदनशीलतेवर ताशेरे ओढणारे इतर लोक स्वत:च असंवेदनशीलतेचे कसे नमुने असतात हे संताप आणणारं असत.
घटना घडली की, तेवढ्यापुरत्या बातम्या करण्यापलीकडे मीही काही करू शकत नव्हते. प्रत्येक वेळी, हातात नवऱ्याचा फोटो घेऊन शून्यात गोठलेली तिची नजर, फाटलेल्या आभाळाची कल्पना न आल्यानं आजूबाजूला बागडणारं तिचं लेकरू, मोठ्या वयाच्या शेतकऱ्याची आत्महत्या असेल तर अंत्यविधीनंतर केसाचा गोटा केलेला अवघा पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा, दिशाहीन टप्प्यावर अडकलेली त्याची निर्विकार नजर.. ही दृश्यं बातमीनंतरही माझा पाठलाग करत राहिली. यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही ही तीव्र असहाय वेदना सोबत घेऊन ! पुढे पुढे, ‘काहीतरी करा मॅडम, आम्हाला मदत मिळेल असं बघा’ या शब्दात कुटुंबाची आर्जवं किंवा ‘कितीही बातम्या करा, काहीच फरक पडत नाही’ ही त्यांची नि:शब्द नजर, ‘आता कशाला शूटिंग करता, आमचं माणूस तर परत येणार का?’ हा त्यांचा हतबल प्रश्न माझी असहाय्यता वाढवत होता.
२०१५चा दुष्काळ पडला होता. औरंगाबादला राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मेळावा होता. त्यात मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकरी विधवांना निमंत्रित केलं होतं. पेरणीसाठी पंधरा हजार रुपयांची मदत त्यांना करण्यात आली. व्यासपीठावर रांगेत बसलेल्या त्या साऱ्याजणी एका सामाजिक जखमेचं प्रतिबिंब होत्या. वीस ते चाळीस वयाच्या त्या साऱ्याजणी. साऱ्यांची रिकामी कपाळं, हडकुळी शरीरं आणि विटकी पातळं. पोटात खड्डा पाडणारं ते दृश्य होतं. त्यानंतर मी जेव्हा संधी मिळेल तशी त्यांच्याशी संपर्क साधू लागले. बातमीपल्याड संवाद करू लागले. वारंवार भेटू लागले. तेव्हा लक्षात आलं, त्यांचं जगणं हा समाजातील महत्त्वाचा प्रश्न आहेच, परंतु त्याहीपेक्षा त्यांच्या जगण्यात शेतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरंही आहेत. डोक्यात हा किडा वळवळत असतानाच केशव गोरे ट्रस्टच्या जयवंत धर्माधिकारी यांनी ‘संशोधनवृत्तीसाठी कोणता विषय आहे का’ असा प्रश्न विचारताच मी पटकन हा विषय सांगितला. त्यांनाही तो तात्काळ भावला आणि प्रवासखर्चाअभावी नाशिक, उत्तर महाराष्ट्र यापुरती मर्यादित असलेली माझी या विषयातील भ्रमंती राज्यभर विस्तारण्याची संधी मिळाली.

काही वेळा घटनाच अशा असतात की, तुम्ही खोल खोल आत रुतत जाता. एकाच वेळी पत्रकार म्हणून त्या घटनेपासून अलगही असता, पण माणूस म्हणून त्या विषयात गुंततही जाता. ‘शेतकऱ्यांच्या विधवा’ या विषयात मी अशीच ओढली गेले; एक पत्रकार म्हणून, एक माणूस म्हणून आणि सर्वांत अधिक एक बाई म्हणून.

ताराबाई असोत वा अकोल्याच्या ज्योती देशमुख, पांढरकवड्याच्या सुनीता, मेहकरच्या वनमाला शिंदे… या साऱ्यांच्या कथा नोंदवत गेले, आणि शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाच्या काळ्या ढगाला असलेली अदृश्य सकारात्मक किनार पुढे आली. केवळ बातमी करताना माझ्यात येणारी हतबलता कुठल्या कुठे निघून गेली. या साऱ्याजणींनी त्यांच्या पातळीवर या प्रश्नावर शोधलेली उत्तरं, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये चिवटपणे टिकवून राहण्यासाठी, जगण्यासाठी त्यांची सुरू असलेली झुंज- सारं मलाच ऊर्जा देणारं ठरलं. पत्नीच्या पोटात आपला गर्भ वाढत असतानाही या परिस्थितीवर मात करण्याची, त्यातून मार्ग काढण्याचा मनात अंकुर फुटत नाही, अशा पुरुषांची अधिकच कीव येऊ लागली. उलट, वयाची पंचविशीही न ओलांडलेल्या, फाटक्या कपाळ्याच्या या बायकांना केवळ आणि केवळ मुलांसाठी जगण्याचं मिळालेलं धैर्य अचंबित करणारं होतं. प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधली होती, पण त्यांना हवी होती एखादी साथ. कधी सासर-माहेरून, कधी एखाद्या संस्थेकडून, सरकारी यंत्रणेकडून. त्या काडीच्या आधारे त्या संकटाचा सागर पार करत होत्या. असहाय्य वळणावरचं त्यांचं ते असामान्य कर्तृत्व एक बाई म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणून मलाच खूप काही शिकवणारं वाटत होतं. या पुस्तकाच्या रूपाने ते बिंदू सांधण्याची संधी मिळाली आणि वार्ताहर म्हणून येणारी असहायता दूर झाली.
२०१८पासून या प्रश्नाला संघटित आवाज मिळत होता. नाम फाउंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उमेद प्रकल्प, शासनाचे उपक्रम, महिला किसान अधिकार मंच… या माध्यमातून त्या संघटित होत होत्या. एकल महिला, संघटनेत नेतृत्वाच्या फळीत आल्या. आपले प्रश्न आणि आपल्या मागण्या मांडू लागल्या. खंबीरपणे बोलू लागल्या. आम्हाला वेगळं काही नको, फक्त पाणी द्या आणि मालाला भाव द्या… शेतीप्रश्नाच्या नेमक्या मुद्दयावर बोट ठेवू लागल्या. शेतकरी विधवांसाठी एकात्म धोरणाचा मसुदा राज्य महिला आयोगाला तयार करावा लागला. सरकार दरबारी तो सादर झाला. त्याने सारे प्रश्न सुटले असं अजिबात नाही. दशकांचे हे प्रश्न सुटण्यासाठी वेळ निश्चित लागणार. मात्र, एक अंधारातील प्रश्न उजेडात आला,ओसरीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात दबलेलं दु:ख चव्हाट्यावर आलं, बांधाबांधावर झुंजणाऱ्या या शेतकरणींच्या कथा जगापुढे आल्या हेही नसे थोडके.

 Deepti-Raut

सामाजिक प्रश्नांना ‘मार्केट’ नसताना, रोहन प्रकाशनाने याच्या प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली, केशव गोरे ट्रस्टने संशोधन वृत्ती दिली, अतुल देऊळगावकरांच्या प्रस्तावनेने प्रश्नाला व्यापक कोंदण दिलं आणि एक महत्त्वाचं दस्त तयार झालं, याचं समाधान आहे. पुस्तक वाचल्यावर वाचकांचे फोन येतात. या महिलांना मदत म्हणून काय करता येईल याची विचारणा होते. खपाच्या पातळीवर अद्याप संथ गती आहे, पण जिथे संधी मिळेल तिथे याविषयी बोलण्याची संधी मिळाली की, पुस्तकखरेदीसाठी गर्दी होते. याचा अर्थ एकच, हा विषय आजही तसा अंधारातच राहिलाय. त्याबाबत संवाद, चर्चासत्र, व्याख्यान या माध्यमांतून खपली निघाली की, लोकं जाणून घेऊ इच्छितात. वाचून गलबलून जातात. केशव गोरे ट्रस्ट, रोहन प्रकाशन यांच्या माध्यमातून अंधारातील या प्रश्नाला उजेडात आणण्याचं महत्त्वाचं काम झालंय. वैयक्तिक पातळीवर वाचकांचा चांगला प्रतिसाद आहे. परंतु अजूनही प्रतीक्षा आहे, ती शासकीय धोरण, राज्यव्यापी संघटना यांच्याकडून अधिक व्यापक प्रतिसाद मिळाल्यास चर्चेच्या पल्याड सोडवणुकीच्या दिशेने जाण्याचा एखादा मार्ग सापडेल.

– दीप्ती राऊत

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०२०


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

Koradi-Sheta-Cover

कोरडी शेतं… ओले डोळे

सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं…ओले डोळे !

160.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *