मुखपृष्ठावरच शीर्षकाच्या तळाला खास लिहिलेलं आहे – ‘कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या…’ निसर्गचक्र पार उलटंपालटं करत जगभराचा माणूस भन्नाट वेगानं धावत होता. पळत होता. या धावपळीत सुसज्ज यंत्रणा हाताशी होती. वेळेशी स्पर्धा होती. त्यानेच निर्माण केलेल्या समाजस्थिरतेसाठीच्या सर्वच्या सर्व व्यवस्था डगमगू लागल्या होत्या. म्हणजे कुटुंबव्यवस्था, शिक्षणयंत्रणा, दहा ते सहा अशी नोकरीतील बांधिलकी, लग्नसंकल्पना, स्त्रीपुरुष मैत्रीची चौकट किंबहुना ‘स्व’शी संवादही साधणं अशक्य व्हावं. यात उलथापालथ होईल असा वेग माणसाने अन् म्हणून जगाने पकडला होता. ‘नियमन मनुजासाठी, मानव न नियमांसाठी’- याची जाणीवच नव्हती. पण अशाच भन्नाट वेगाने जीवनाला अचानक खीळ बसली. करोनाची खीळ. माणसं बेरोजगार झाली. घरातच डांबली गेली. घरातील माणसांमध्ये परस्परसंबंध उजळू-डागळू लागले नव्याने. उपरी माणसं शहरं सोडून आपापल्या गावी परतू लागली. ‘वर्क फ्रॉम होम’ बरोबरच ‘वर्क फॉर होम’ एकमेकांना सहन करत, एकमेकांना समजून घेत वा स्वत:लाच नव्याने उमजून घेत, कधी छंदफंद जोपासत जगू लागली.  या जगण्याचं एक कथारूप पुस्तक करावे असे संपादिका अनुजा जगताप यांना वाटले. माक्र्वेझच्या ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’सारखे थोर पुस्तक ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ मग जन्माला आले. या करोनाकाळात अनेक इ-पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे ऑनलाईन प्रकाशन झाले. पण ‘रोहन प्रकाशन’ने मनावर घेऊन या अष्टकथांचे चक्क पुस्तकच हातात दिले. वाचक-प्रकाशकाचे असेही हे ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना!’या सर्व कथांत प्रेम ही संकल्पना आणि लिखाणाच्या बाबतीत हे सर्व लेखक हृषीकेश पाळंदे म्हणतात त्याप्रमाणे ‘कोविड पॉझिटिव्ह!’

…यांत पहिलीच कथा गणेश मतकरींची. ‘नाऊ यू सी मी…’ नावाची. ज्ञान-अज्ञाताच्या, वास्तवाशी मानसिक प्रेरणा जुळण्याच्या पातळीवर ही कथा एकमेकांचे संबंध उलगडते. किंबहुना उलगडण्याच्या प्रयत्नात ते अधिक गहिरे होतात. स्वप्नपातळी, वर्तमान-भूतकाळ, बिल्या मांजराचे या सगळ्यासाठी येणारे मनाशी लुडबुडणारे भासमान रूप, आई-वडिलांचे परस्पर दूरातले संबंध जे आता नायक आणि बायको प्रिया यांच्या बाबतीतही तस्सेच आहेत. वडील अप्पा पुण्याला कालवश होतात, पण मुंबईतल्या मुलाशी आदल्या रात्री संवाद साधतात. हा संवाद खरा की खोटा? अंतर्मनाची ती पित्याची पुत्राला साद? की मुलगा म्हणून जगलेले सगळे बालपण पणाला लावत मुलाच्या मनाने उभारलेला तो आभास?  आई आणि पत्नी प्रिया या दोन स्त्रिया पतीपासून दुरावलेल्या की दूरातही प्रेमाला सांभाळणाऱ्या?… अशा अनेक प्रश्नांना कवेत घेत, भास-आभासांची प्रतिमाने उभी करत स्वत:चे मन तपासत हे घटना-निवेदन येते. करोनाकोंडीमुळे वडिलांचे शेवटचे दर्शन नाही; हे सत्य, याच कोंडीमुळे स्वत:चे ‘वर्क फ्रॉम होम’ सांभाळत प्रियाचे याला सांभाळणे-अगदी वेगळं व्हायचा निर्णय घेऊनही… अशी एकमेकांची गुंता आणि गुंतवणूक एक भावचित्र म्हणून तपशिलात उभी राहते. अतिशय प्रभावी कथा. अवतीभवती करोनामुळे येणारे रंगफटकारे आणि फोकस केंद्रस्थानी असलेल्या घटनेचा परिणाम सांगण्यावर. नायकाच्या आत्मनिवेदनात, तरीही तटस्थ.

loveinthetime3
गणेश मतकरी यांच्या ‘नाउ यू सी मी’ कथेची सुरुवात…

दुसरी कथा करोनाच्या साथीने पतीपत्नी-संबंधातील साथ साथ आणि तेढ दाखवणारी. पोलिसी जगातील. सुरुवातीला गूढ रहस्य पेरणारी. म्हणून थोडी वेगळी. चित्रमय संवादात ही नाट्यशैली आहे सुरुवातीला. मिलिंद करंजकर हा कैदी बलात्कारासाठी गुन्हेगार. कोविड पॉझिटिव्हना सोडून द्यायचे आदेश. अशा वेळी इन्स्पेक्टर राणे मिलिंदला या यादीतून वगळण्याची व्यवस्था करतात. का?… इथून नाट्य सुरू होते या चित्रकथेत. राणेंची पत्नी राणेंना फसवतेय या संशयावरून हा पॉझिटिव्ह असलेला मिलिंद तिच्यावर सोडण्याचा कट म्हणजे मिलिंदची सुटका याच अटीवर. पल्लवीवर बलात्कार करण्याच्यावेळी मात्र मिलिंद प्रामाणिक राहून वस्तुस्थिती सांगतो तेव्हा पल्लवीला नवऱ्याचे खरे रूप कळते. ‘एखादं सत्य नाकारण्यापासून तर ते स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास अनेकदा खूप दीर्घ असतो, तो सोपाही नसतो.’ मात्र पल्लवी तो लगेच करते आणि ती दोघेही पळून जाण्यासाठी घर सोडतात. (पृ. ४४)

इथून सुरू होतो करोनाकाळातील गावी जाणाऱ्यांचा गर्दीतला प्रवास आणि त्याचे वास्तव रूप. कसलेल्या पत्रकाराच्या थाटात लेखकाने वास्तव उभे केलेय. ‘इंदौर, एमपी’ला जाणाऱ्या बसच्या टपावरून प्रवास, मध्येच पोलिसांनी गाडी अडवणे, मग उतरून सहप्रवाशातली रात्रीची पायपीट, अखेर मध्येच कुठेतरी पल्लवीची गाठ अन् मग साथ… मग दोघांचा संवाद… एखाद्या चित्रकथेचा हा ऐवज. लेखकाने वस्तुस्थिती हाताशी धरून आणखी रंगत आणली आहे ती ‘वाइफ स्वँपिंग’ची पार्श्वभूमी वापरून. इन्स्पेक्टर राणेंचं ‘पुरुषाच्या मेंदूला विकृतीच्या व्हायरसचा संसर्ग झालेले’ रूप इथे येते. मग अपेक्षित शेवट होतो तो मिलिंद-पल्लवीच्या एकमेकांबरोबर राहण्याच्या निर्णयाने. पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश म्हणून कुमार गंधर्वांचे गाणे- समर्पक असे- ‘मेरी नैया निके चालन लगी’… अशी परिस्थितीच्या लाटांवर सहजतेने डुलणारी वेगळी प्रेमकथा बोजेवार ‘चितारतात’.

नीरजा यांची स्त्रीवादी कथा.(स्त्रीवाद हा शब्द अर्थ घासून घासून फारच गुळगुळीत झालाय.) ‘एक तुकडा आभाळाचा…’ यजमानांचा या काळात मृत्यू. ‘एका तुकड्यात राहण्याची सक्ती’ एका सिनेमाच्या तुकड्यात.  त्याशी सांधू पाहणारे हे स्त्रीमन कथेत. ‘…की असा हा लॉकडाउन अप्रत्यक्षपणे येत असतोच प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या तऱ्हेने.’ हा तिच्या मानत घुमणारा प्रश्न. पतीपत्नीचा चाळीस वर्षांचा संसार. पण मृत्यूनंतर बाहेर लॉकडाउन असला तरी तिच्या मनात आठवणी- त्याही प्रियकराच्या ‘अनलॉक’ होतात. ‘नवराच नाही ना. त्यामुळेच तर बाहेर काढलेय तुला’ म्हणत ती मंतरल्यासारखी होते. नटते, सजते. रात्री विशेष. त्या ‘आकाश’चा मागोवा घेणे हा तिच्या मनातला आभाळाचा तुकडा भरून आलेला या कथेत. एक वेगळी कथा.

अशा अनेक वेगळ्या आणि आगळ्या कथा आहेतच या कथासंग्रहात. त्या सगळ्यांचा वेध घेणे इवल्याशा परिघात केवळ अशक्यच. म्हणून थोडक्यात इतर कथांचा वेध घेणे आले. त्या त्या लेखकांची खरं तर क्षमा मागून! ‘माय गाव कोणतं…’ ही परेश जयश्री मनोहर यांची कथा. जात आणि जातीवरून माणसाला वागवण्याचा अनुभव या कथेत. मजुरीवर, कष्टावर जगणारं भटकं जीवन. आजानं गाव सोडलं, बापानं गाव सोडलं, आता नवरा गाव सोडतो. शेवटी करोनामुळे ही भटकी बाई नवरा-मुलांसह ‘जनावरासारखं जगण्यापेक्षा आपल्या गावात जाऊन माणसासारखं जगू पाहते.’ पण करोनामुळे तिला गावाबाहेरच रोखले जाते. ही वाट्याला आलेली हतबलता ‘बहात्तर मैलाचा प्रवास’ सारखीच तपशील जिवंत करत येते.

मनस्विनी लता रवींद्र, मनामनांच्या नात्याकडे खोलवर पाहत वेगळेपणाने, वेगळ्या आकृतीत व्यक्त होणाऱ्या. ‘जादूची बोट’ ही त्यांची कथा याचीच साक्ष.

प्रवीण धोपट यांची ‘बी निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह’ ही कथा. स्वप्निल आणि मितालीची. त्याच्या मनात मितालीच्या नोकरीतील स्टेट्सविषयी, हुशारीविषयी आकस. स्वप्निलचे रिकामपण त्याला अधिक दुबळे करून टाकते. अगदी आत्महत्येच्या विचारापर्यंत ते जातं, पण तोवर मितालीला दिवस गेलेले अन् मग त्याची जगण्याची ऊर्मी. असा ताणतणाव, मानसिक उलाघाल यांनी झाकोळलेल्या स्वप्निलची ‘शेवट गोड’ होणारी ही कथा.

‘जस्ट अ लव्हस्टोरी’ ही प्रणव सखदेव यांची कथा वेगळी, वाचकमनाला गुंतवून ठेवणारी. तीनेक महिन्यांचा काळ. पण महामारीची साथ, लॉकडाउन, आईचं जाणं, केऑटिक वाटणं – ‘सॅनिटाइज करणं म्हणजेच आपण असणं’… अशा सगळ्यात आईच्या मृत्यूनंतर भेटलेली ती आणि मग त्या दोघांचा संवाद… असं सहजपणे संवाद-कथानक वाहत राहतं. यात डिप्रेशन-रडून मोकळं होणं- तरीही लॉकडाउनमुळे अंतर तसंच राहतं. लग्न झालेली मैत्रीण एकेकाळी त्याची होणार होती. ती अशी समोर येते अन् वेगळ्या संबंधांचे संवादातून लेप चढतात. ते गेले की दोघेही शेवटी दूर!  हा जवळ-दुराव्याचा पट संवादातून-छोट्या क्रियांतून व्यक्त होत राहतो, पण तरीही व्यक्त होता होताच अव्यक्त.

मनस्विनी लता रवींद्र, मनामनांच्या नात्याकडे खोलवर पाहत वेगळेपणाने, वेगळ्या आकृतीत व्यक्त होणाऱ्या. ‘जादूची बोट’ ही त्यांची कथा याचीच साक्ष. पल्लवीच्या लहानपाणापासून येणाऱ्या सावलीसारख्या आठवणी. नवऱ्याबरोबर असतानाही सासूच्या नजरेचा ‘ड्रोन’ रोखून आहे- असे तिला वाटत राहते. त्यातूनही पळवाट शोधत ती ‘विचार’ करते, जो ‘अगदी सासूलापण नाही.’ पण तसं ते नसतं.  तिची उंची, तिचं वावरणं, सिरीयल टाइप आयुष्य जगणं(अगदी ते जगू नये वाटूनसुद्धा!) …अशी वर्षं एक, दोन, तीन… या कथेत येत राहतात. नवरा आणि सासूच्या ड्रोनसह ती आशीषशी संवाद साधते, मेसेज पाठवते. हीच इथून दूर जाणारी पळवाट, प्रवासाला निघालेली बोट!

हृषिकेश पाळंदेची ‘कुयला’ ही या पुस्तकातील अंतिम कथा. अर्थात वाचन कुठल्याही कथेने सुरू करावे इतकी प्रत्येक कथा स्व-तंत्र आहे. ही लोककथेच्या ढंगाची, या मातीतली. खरं तर ‘सृष्टीमायची’ म्हणजे मातीचीच कथा. वाळवी, सृष्टी ही माणसांसारखी व्यक्तिमत्त्वं. आपापसात बोलतात, व्यक्त होतात. माणसाला ‘हाव धरायची नाय’ याची शिकवण धडा देऊन शिकवतात. खाज येणारा, सूज येणारा, बेरूप करणारा वेळ करोनाप्रमाणेच पसरतो. माणसाला जगणं अशक्य करतो. ‘घरीच रहा. सुरक्षित रहा’ ही टेंपरवारी नेत्याची घोषणा, ‘शेतीची’ कामं खोळंबणं, भूकमारी, गाव सोडणं… असं आजचेच चित्र त्यात तिरकसपणे येतं. सृष्टीमाय म्हणते, “मी काय नाय केलं बाये. हे सर्व तुमी माणसांनीच केलंय.” (‘काय नाय’ म्हणणारी सृष्टीमाता ‘माणूस’ म्हणेल की मानूस?- असा प्रश्न इथे पडू नये!) मग उतारेपातारे, भगतीण, राजकारण येत राहतं. शेवटी फार समर्पकपणे सांगितलं जातं की, ‘बीसीतली ही गोष्ट वीसवीसमध्ये टायपून तो उठला.’ (पृ १९४) ‘शेवटी आतल्याबाहेरच्याची कशी भुरी माती होईल तेव्हा होईल’ असे म्हणत हा लेखक उठतो आणि ‘कुयला’ तसाच राहतो. (‘कुयला’ म्हणजे ‘खाजकुयली’!) निसर्ग, मानव, माणूस-त्याचं मन, लेखननिर्मिती आणि वास्तव यांची ही अशी मनाला ‘कुयला’ लावणारी अखंड खाजरी कथा. वाचनाचा ‘कंडू’ शमवणारी!

असा हा प्रेमाच्या… ओढीच्या आठ कथांचा नवरत्न खजिना.

‘लॉकडाउन’मधला एकाकीपणा संपवणारा ‘लॉकडाउन’ संपेलच समजा; तरीही हा खजिना न संपणारा…

-सुहासिनी कीर्तिकर

( सौजन्य : ‘ललित’, लक्षवेधी, ऑक्टोबर २०२०)
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल डिसेंबर २०२०


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

लव्ह इन द टाइम ऑफ करोना

कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या

एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?

LITOC-cover

250.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *